सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथील भारती शुगर्स अँड फ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मोहनराव कदम यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोळी पूजन झाले. कारखान्याचे मार्गदर्शक रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी मागील हंगामाप्रमाणे यंदाही चांगला ऊस दर दिला जाईल. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना कोणतीही समस्या अथवा अडचणी येऊ न देता ऊस तोडणी वाहतूक केली जाईल अशी माहिती दिली.
‘सोनहिरा’चे कार्यकारी संचालक एस. एफ. कदम यांनी कर्मचाऱ्यांना हंगाम सुरळीत चालवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. भारती शुगर्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात करून यंदाच्या गळीत हंगामासाठी केलेल्या सर्व कामाच्या तयारीचा आढावा सांगितला. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष संपतराव माने यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. ऊस पुरवठा अधिकारी सुजित मोरे यांनी आभार मानले. ‘भारती शुगर्स’चे अध्यक्ष ऋषिकेश लाड, राजेंद्र लाड, अरुण दिवटे, महेश जोशी, एम. एस. पाटील, व्ही. पी. सूर्यवंशी, पी. पी. पाटील, संजय मोहिते आदी उपस्थित होते.