कोल्हापूर : वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात मान्यवरांच्या हस्ते मोळी पूजन करून गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सरदेसाई व त्यांची पत्नी यांच्या हस्ते काटा पूजन झाले. कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती, जिल्हा बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, उपव्यवस्थापक फरास, बँक निरीक्षक राजू रत्नकुमार खाडे, बँकेचे साखर गोडाऊन प्रतिनिधी रमेश देसाई यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकली.
कारखान्याने यंदा चार लाख टनांवर गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी पुरेशी तोडणी-ओढणीची यंत्रणा कार्यरत केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्याकडेच ऊस घालावा, असे आवाहन प्रभारी कार्यकारी संचालक ज्योती यांनी केले. ते म्हणाले, ‘कारखान्याने स्थानिक तसेच बीड येथील ऊस तोडणी यंत्रणा कार्यरत केली आहे. सायलो सिस्टमचाही वापर केला जाणार असल्याने गाळप वाढण्यास मदत होणार आहे. जिल्हा बँकेच्या सहकार्याने ऊस बिले वेळेत दिली जातील. चीफ केमिस्ट संभाजी सावंत, चीफ इंजिनिअर सुरेश शिंगटे, मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, चीफ अकाउंटंट प्रकाश चव्हाण, सिव्हिल इंजिनिअर शंकर आजगेकर, कामगार अधिकारी सुभाष भादवणकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सरदेसाई, सचिव बाळू दळवी आदी उपस्थित होते.