कोल्हापूर : कोल्हापूर आणि कोल्हापुरी गुळ यांची यांची ओळख सातासमुद्रापार पोहचली आहे. कोल्हापुरी गुळाला जगभरातून मागणी आहे. येथील सुपीक माती, स्वच्छ पाणी आणि अनुकूल हवामानामुळे कोल्हापुरी गुळाला विशिष्ट चव आहे. त्यामुळेच शतकानुशतके कोल्हापुरी गुळाची ख्याती टिकून आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषतः अर्जुनवाडा आणि कागलमध्ये उत्पादित होणारा गुळ खूपच प्रसिद्ध आहे.
भौगोलिक संकेत (जीआय) टॅग असलेल्या कोल्हापुरी गुळाने केवळ स्थानिक बाजारपेठांची मागणी पूर्ण केली नाही, तर यूके, यूएसए आणि दुबई यांसारख्या देशांमध्ये लक्षणीय निर्यात करून जागतिक स्तरावर ओळख मिळवली आहे. जिल्ह्यात एकेकाळी 1000 हून अधिक गुऱ्हाळघरे होती, मात्र गेल्या काही वर्षात अडचणींचा सामना करणाऱ्या गुळ उद्योगाला घरघर लागली आहे.सध्या जिल्ह्यात केवळ 100 ते 150 गुऱ्हाळघरे उरली आहेत. त्यांच्यासमोरही कित्येक अडचणी उभ्या आहेत.
वाढता उत्पादन खर्च, मजुरांचा तुटवडा, भेसळ अशा अनेक आव्हानांना कोल्हापुरी गुळ तोंड देत आहे. कोल्हापुरी गुळाचे व्यापारी आणि उत्पादक गुळातील साखरेच्या वाढत्या प्रमाणामुळे चिंतेत आहेत. भेसळीमुळे कोल्हापुरी गुळाच्या गुणवत्तेत घसरण होत आहे. याव्यतिरिक्त, पॅकेज केलेल्या गुळावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केल्याने संघर्ष आणखी वाढला आहे. त्यामुळे किमतीत आणखी वाढ झाली आहे. परिणामी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी होत आहे.
कोल्हापुरातील गुऱ्हाळचालक सुयोग पाटील यांनी ‘एएनआय’ला सांगितले की, मी ५-६ वर्षांपूर्वी हे गुऱ्हाळघर सुरू केले होते. पूर्वी जिल्ह्यात 1000 हून अधिक गुऱ्हाळघरे होती, पण आता ही संख्या बरीच कमी झाली आहे. आता फक्त 100 ते 150 गुऱ्हाळघरे उरली आहेत. याला दोन प्रमुख कारणे आहेत, ती म्हणजे कामगारांचा तुटवडा आणि गुळाचे न वाढलेले भाव. गेल्या दहा वर्षांत महागाईत प्रचंड वाढ झालेली असताना गुळाचा भाव मात्र तसाच आहे. दशकभरापूर्वीच्या तुलनेत उसाची किंमत वाढली, मात्र गुळाचे दर स्थिरच राहिले, त्यामुळे हा उद्योग आता व्यवहार्य राहिलेला नाही. त्यामुळे गुऱ्हाळघरांची संख्या कमी झाली आहे.
पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या गुळाला जीआय (जिऑग्राफिकल इंडिकेशन) टॅग मिळाला आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरची बाजारपेठ सुरू केली होती, तेव्हापासून येथे गुळ बनवला जात आहे. वर्षानुवर्षे तो एक ब्रँड बनला आहे, जो आता ‘शाहू ब्रँड’ म्हणून ओळखला जातो. यातील बहुतांश गुळ निर्यात केला जातो. बाहेरून गुळाला चांगली मागणी असली तरी येथील गुऱ्हाळघरांची संख्या कमी होत आहे. गुजरातला जाणारा गुळही कमी झाला आहे.
पाटील यांनीही कोल्हापूरच्या बाजारपेठेत ‘कोल्हापुरी’ लेबलखाली इतर राज्यांतून गुळाची विक्री होत असल्याच्या मुद्द्यावर प्रकाशझोत टाकला. येथील मातीच्या समृद्धीतून कोल्हापुरी गुळाचा गोडवा येतो, असे ते म्हणाले. आता कोल्हापुरी गुळाचे स्टिकर लावून परराज्यातून आलेला गूळ कोल्हापूरच्या बाजारपेठेत विकला जात आहे. इतर राज्यांतील गूळ बाजारात विकला जात असताना कोणतीही अडचण नाही. शेवटी, हा खुला बाजार आहे. पण बाहेरील गुळ ‘कोल्हापुरी’ म्हणून विकणे गैर आहे. यामुळे अस्सल कोल्हापुरी गुळाची प्रतिष्ठा आणि किंमत यावर परिणाम झाला आहे.
कोल्हापुरी गुळाचा अनोखा गोडवा इथल्या मातीच्या समृद्धीतून येतो. या मातीमुळेच कोल्हापुरी गुळाला त्याची खास चव आणि लोकप्रियता मिळते. बहुतेक गुळ गुजरातला जातो. गुजरात आणि इतर राज्यांतील व्यापारी गुळ विकत घेतात आणि तो संपूर्ण भारतात पाठवतात. इतर राज्यातील गुळाला ‘कोल्हापुरी’ लेबल लावण्याची प्रथा तातडीने बंद करण्याची गरज आहे. यावर नियंत्रण ठेवल्यास अस्सल कोल्हापुरी गुळाची किंमत वाढेल, तसेच येथील गुऱ्हाळघरांची संख्या पुन्हा पूर्वीप्रमाणे वाढू शकते. पाटील म्हणाले की, गुऱ्हाळघरे बंद होण्यामागे घसरलेले भाव आणि कामगारांची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत.
जीएसटीच्या नकारात्मक परिणामाबद्दल बोलताना कोल्हापूरच्या श्री शाहू मार्केट यार्डातील गुळाचे व्यापारी अतुल शहा म्हणाले की, जीएसटीमुळे विक्री दरात वाढ झाली आहे. शाह यांनी ‘एएनआय’ला सांगितले की, लेबल केलेल्या गुळावरील ५ टक्के जीएसटीमुळे विक्रीची किंमत वाढली. जर सरकारने हा कर हटवला तर त्याचा उद्योगाला मोठा फायदा होईल आणि शेतकऱ्यांनाही जादा पैसे मिळतील. ते म्हणाले, पांढऱ्या गुळाच्या वाढत्या मागणीमुळे भेसळीत वाढ झाली आहे. त्यात अनेकदा साखर मिसळली जाते. त्यामुळे गुळाची गुणवत्ता राहत नाही.
सेंद्रिय गूळ उत्पादक शेतकरी बाळासाहेब पाटील म्हणाले की, कोल्हापुरी गूळ उद्योगाची घसरण आपण पाहिली आहे. पूर्वी १,२००० गुऱ्हाळघरे होती, मात्र आता फक्त ५० उरली आहेत. उच्च दर्जाच्या गुळाच्या आरोग्यविषयक फायद्यांबाबत जागरूकता नसल्यामुळे तसेच कामगारांच्या कमतरतेमुळे गुळ उद्योगाला फटका बसला आहे. सेंद्रिय शेतीचे समर्थक पाटील म्हणाले की, त्यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय गुळात जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. बाजारात मात्र भेसळयुक्त गुळाचा भरणा आहे.
बाळासाहेब पाटील म्हणाले, आम्ही कोणतेही रसायन वापरत नाही. आम्ही फक्त उसाचा रस उकळून गुळ बनवतो. आमच्या गुळामध्ये आठ ते नऊ प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, त्यामुळे हा गुळ इतर व्यावसायिक वाणांपेक्षा जास्त आरोग्यदायी ठरतो. सेंद्रिय गुळाच्या फायद्यांविषयी जागरुकता वाढवल्यास बाजारपेठेत पुनरुज्जीवन होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.