कोल्हापूर : जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील दत्त –दालमिया साखर कारखाना वगळता इतर कारखाने अद्याप सुरू झालेले नाहीत. दसऱ्याच्या मुहूर्तावर बहुतांशी कारखान्यांनी बॉयलर पेटवले असले तरी गव्हाणी अद्याप उसाच्या मोळीच्या प्रतीक्षेतच आहेत. बुधवारी (दि. २०) मतदान झाल्यानंतर मोळी पूजन करून कारखाने सुरू करण्याची मानसिकता दिसते. कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले पोर्ले (ता. पन्हाळा) येथील एकमेव साखर कारखाना सुरू झाला आहे. नेते प्रचाराच्या फडात रंगल्याने ऊस मात्र शिवारात तसाच उभा आहे. दरम्यान, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर जरी हंगाम सुरू झाला तरी त्यावर पावसाचे सावट राहणार आहे.
साखर हंगाम लांबल्याने गुऱ्हाळघरे यंदा जोमात आहेत. नोव्हेंबर संपत आला तरी अद्याप कारखाने सुरू नाहीत, त्यामुळे खोडवा उसाचे गाळप होण्यास फेब्रुवारी, मार्च उजाडणार आहे. तो ऊस गुहाळघराला पाठवून तिथे दुसरे पीक घेण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहेत. जिल्ह्यातील पशुधन आणि वैरणीचे क्षेत्र पाहिले तर पिकांवरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. मे ते ऑगस्टपर्यंत उसाचा पाला, ऑगस्ट ते ऑक्टोबर ओले गवत त्यानंतर उसाच्या वाढ्याचा चारा म्हणून वापर केला जातो. डोंगरमाथ्यावरील गवत संपले आहे. त्यात साखर कारखाने सुरू नसल्याने चायाचा प्रश्न
गंभीर बनला आहे.