कोल्हापूर : यावर्षी कागल तालुक्यातील ४ साखर कारखान्यात सुमारे ५ लाख मे. टन ऊस तोडणी मशीन द्वारे (Sugarcane Harvester) तोडला जाईल. गेल्यावर्षी कागल तालुक्यातील ४ कारखान्यांकडे तोडणी मशिनद्वारे एकूण साडेतीन लाख टन ऊस आला होता. यावर्षी यामध्ये एक लाख टन उसाची वाढ होणार आहे. साखर कारखानदारी क्षेत्रात ऊस तोडणी यंत्र एक महत्त्वाचा पर्याय कमी वेळेत रूढ झाला आहे. गेल्या चार-पाच वर्षांत या तोडणी यंत्रांचे महत्त्व चांगलेच वाढले असून, कारखान्यांच्या पुढाकाराने वाहनधारक आता हे साहस करीत आहेत. मात्र, यामध्ये आर्थिक गुंतवणूक मोठी असते. एक तोडणी यंत्र ऊस साठवणीच्या २ ‘इनफिल्टर ‘सह याची किंमत १ कोटी १० लाखपर्यंत आहे. ऊसतोड यंत्रे आता जवळपास प्रत्येक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडत आहेत.
छत्रपती शाहू कारखान्याकडे गेल्या हंगामात १५ मशिन होती, तर यंदा २२ आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याकडे गेल्या हंगामात १० मशिन होती, तर यंदा १२ आहेत. तर मंडलिक कारखान्याकडे गेल्यावर्षी २ मशिन होती, तर यंदा ७ आहेत. बिद्री कारखान्याकडे गेल्यावेळी ५ होती, तर यंदा ७ मशिन आहेत. या चारही कारखान्याकडे गेल्या हंगामात ३२ मशिनद्वारे साडेतीन लाख टन ऊस तोडला होता. यंदा ४८ मशिनद्वारे ५ लाख टन ऊसतोड होण्याची शक्यता आहे. यंत्रांद्वारे ऊसतोडणीसाठी विशेषतः मोठे प्लॉट लागतात. दिवसभरात एक मशिन साधारण १०० टन ऊस तोडते. यामुळे ऊस तोडणी लवकर होते. जमिनीला घासून तोडणी होते. खोडवे चांगले फुटते. पाला जमिनीवरच बारीक होऊन पडल्याने त्याचे खत होते. मजूर तोडणीप्रमाणे उसाची पेरे वाड्यात जात नाहीत. त्यामुळे आता लोकांमधील गैरसमज दूर होऊन या तोडणीला प्राधान्य देत आहेत.