छत्रपती संभाजीनगर : करमाड चित्तेपिंपळगाव येथील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात चार लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाही शासनदराप्रमाणेच ऊस उत्पादकांना पैसे देण्यात येतील, त्यांनी आपला ऊस छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याला द्यावा, असे आवाहन कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक तथा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाच्या २४ व्या गाळप हंगामाचा शुभारंभ हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उसाच्या गव्हाणीत मोळी टाकून झाला, यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष दामोदर नवपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या गळीत हंगाम प्रारंभ सोहळ्यास संचालक देवजीभाई पटेल, प्रकाश काकडे, विवेक देशपांडे, बळीराम उकरडे, प्रल्हाद पन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी दामोदर नवपुते व रामू काका शेळके यांच्या हस्ते ऊस गव्हाणीची विधिवत पूजा करण्यात आली. बागडे म्हणाले की, कारखान्याला २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. उस उत्पादकांना नेहमी चांगला भाव देण्याचा प्रयत्न संचालक मंडळांचा प्रयत्न राहिला. याप्रसंगी सभापती राधाकिसन पठाडे, दत्तराज किन्नर, श्रीराम शेळके, भागचंद ठोंबरे, सजनराव मते, निवृत्ती गावंडे, संतू गावंडे, ज्ञानेश्वर ठोंबरे, अशोक पवार, योगराज देशमुख, प्रकाश चांगुलपाई, सुदाम ठोंबरे, जयदीप घुगे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक जनरल मॅनेजर दिगंबर बडदे यांनी तर सूत्रसंचालन मुख्य लेखपाल शिवाजी टकले यांनी केले.