नाशिक : ऊस उत्पादक हा केंद्रबिंदू मानून द्वारकाधीश कारखाना काम करीत आहे. नुसते लागवडीखालील क्षेत्र वाढवून उपयोग नसून प्रति एकरी ऊस उत्पादन वाढवून किफायतशीर परतावा मिळण्यासाठी कारखाना प्रयत्नशील आहे. यंदाच्या हंगामात सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून, उसाला भाव देण्यात कारखाना कमी पडणार नाही. दोन टप्प्यांत मोबदला दिला जाईल, अशी घोषणा कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी केली. शेवरे (ता. बागलाण) येथील द्वारकाधीश कारखान्याचा २५ वा रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम सुरू झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष शंकरराव सावंत होते.
संस्थापक अध्यक्ष शंकरराव सावंत म्हणाले, की कारखान्याच्या ऊस उत्पादकांचे प्रति एकरी उत्पन्न वाढविण्यासाठी कारखाना प्रयत्नशील आहे. त्यासाठी कारखान्यामार्फत एकरी १००.टनांकडे झेप हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. दरम्यान, गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी एकरी १०० टनांपर्यंत उसाचे उत्पादन घेतलेल्या एकनाथ साळवे, कौतिक बोरसे, सुनील सोनवणे, सुनील पाटील, चंद्रेश गावित यांच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन झाले. जास्तीत जास्त प्रती एकरी ऊस उत्पादन घेणाऱ्या उत्पादकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ऊस उत्पादकांना नवीन ऊस जातीचे प्लॉट, खोडवा, निडवाचे प्रात्यक्षिक प्लॉट दाखवण्यात आले. शेतकी अधिकारी विजय पगार, संचालक सावंत यांच्या हस्ते उसाने भरून आलेल्या पहिली बैलगाडी व ट्रकचे पूजन करण्यात आले. राजेंद्र शिरवाडकर, दीपक सोनवणे, बाळासाहेब देवरे, राजेंद्र सोमवंशी, बाजीराव बोडके, चंद्रकांत महाजन, काशिनाथ नंदन, विशाल आढाव, सरला अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले.