बेळगाव : जिल्ह्यात सोयाबीन काढणी केलेल्या क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी ऊस लावणी सुरु केल्या आहेत. सध्या तंबाखू पिकातून ऊस लावणीची कामे सुरू झालेली आहेत. सर्वच कामे एका वेळी सुरू झाल्याने या भागात मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पैरा पद्धतीने कामे गतीने सुरू झालेली दिसत आहेत. सध्या रब्बी हंगामातील विविध कामांचा जोर वाढला आहे. त्यासाठी पोषक वातावरण असून थंडी वाढली आहे.
यंदा सुरुवातीपासून पाऊस सुरू झाल्याने ऊस पिकावर परिणाम झाला आहे. सध्या पोषक वातावरण असून कामांना गती आली आहे. त्यामुळे ऊस लावणीसह गहू, हरभरा, कांद्यासह इतर पिकांना पाणी देण्यासाठी शेत शिवारात मजूर व शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी वातावरणाचा अंदाज घेत विविध पिकांतून उत्पन्न वाढविण्याकडे कल दिसत आहे. सध्या पैरा पद्धतीचा अवलंब केल्याने कामे वेळेत व गतीने पूर्णत्वाला येण्यास मदत होत आहे.