कोल्हापूर : यंदा पावसाळा हंगाम संपला, तरी अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे शेतीच्या कामांना जबर फटका बसला. अशात नियमित पूर्वहंगामी एकसाली ऊस लागवडीलाही ‘ब्रेक’ लागल्याचे पाहायला मिळाले. आता ऊस लागवडीला गती आली असली तरी रोपे तयार नसल्याने मागणी पूर्ण करताना ऊस रोपवाटिका चालकांची दमछाक होत असून प्रती रोप दरात २० ते २५ पैशांची वाढ झाली आहे. लांबलेला हंगाम, दिवाळीची सुटी, सततचा पाऊस यामुळे ऊस रोपवाटिकांमधील कामे ठप्प झाली होती. सण संपल्यावर हवामान अनुकूल झाल्याने रोपवाटिका गतिमान झाल्या. त्यात पुन्हा विधानसभा निवडणुकीमुळे शेतमजुरांची कमतरता भासत आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे.
ऊस लावणीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या रोपांचा पुरवठा अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. रोपवाटिकांकडे मागणीपेक्षा कमी रोपे तयार आहेत. भात, सोयाबीन कापणीच्या कामात मजूर अडकले. पावसामुळे जमिनीच्या मशागतीस उशीर झाला. रोपांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांना जादा खर्च करून अन्य भागांतून रोपे आणावी लागत आहेत. रोपवाटिका चालकांकडे रोपांच्या मागणी फुल्ल आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील रोपवाटिकांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक भागातून मागणी वाढू लागली आहे. लांबलेली मशागत, ठप्प झालेल्या कामामुळे रोपनिर्मिती खोळंबली. आता मागणी वाढत असून, मुबलक रोपे तयार नाहीत. त्यामुळे पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.