सांगली : महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांतील साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे जत तालुक्याच्या पूर्व भागातून ऊस तोडणी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. कृष्णा नदी काठालगतच्या भागामध्ये ऊस क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे या भागातून कर्नाटकमध्ये ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांची संख्या अधिक आहे. उगार, अथणी, इंडी, पडसलगी, चिकोडी, रायबाग आदी कारखान्यांकडे तोडणी मजूर अधिक संख्येने जातात. संख, पांढरेवाडी, कुलाळवाडी, मोटेवाडी, गोंधळेवाडी, तोळबळी, करेवाडी (तिकोंडी), धुळकरवाडी, करेवाडी (कों. बोबलाद), तिल्याळ, लमाणतांडा (दरीबडची), लकडेवाडी, पांडोझरी या गावांतील मजूर ऊस तोडणीसाठी रवाना झाले आहेत.
जत दुष्काळी तालुका आहे. दुष्काळ, रोगांनी वाया गेलेल्या फळबागा, औद्योगिकीकरणाचा अभाव, शेतीपूरक व कुटिरोद्योगांना लागलेली घरघर या कारणांमुळे वर्षातील सहा महिने जगायचे कसे, असा प्रश्न या भागातील जनतेसमोर असतो. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी जत पूर्व भागातील मजूर, ग्रामस्थ ऊसतोड व वीट भट्टी मजुरांची संख्या जास्त वाढली आहे. यंदा हंगाम लांबल्याने ऊसतोड मजुरांनी मुकादमा कडून उचल घेऊन दिवाळी साजरी केली. आता राज्यातील काही साखर कारखाने सुरू झाले आहेत. तेथे मजूर पोहोचले आहेत. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय मजुरांसह हान मुलेही स्थलांतरित होत असल्याने शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होणार आहे.