विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे दोन्ही युनिट करणार २६ लाख मे. टन ऊस गाळप : उपाध्यक्ष वामनराव उबाळे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर व करकंब युनिटमधून एकूण २६ लाख टन उसाचे गाळप होणार आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष वामनराव उबाळे यांनी ही माहिती दिली. दोन्ही युनिट ऑफ सीझनमधील कामे वेळेत पूर्ण करून गाळपासाठी सज्ज झालेले आहेत. पिंपळनेर युनिटमध्ये २५ हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस नोंद झाली आहे. तर करकंब युनिटमध्ये ७ हजार ३०० हेक्टर क्षेत्रातील ऊस नोंद झालेली आहे. हंगामामध्ये पिंपळनेरमध्ये २० लाख व करकंबकडे ६ लाख मेट्रीक टन ऊस गाळप करण्याचे उदिष्ट संचालक मंडळाने निश्चित केले आहे, असे ते म्हणाले.

कारखान्याच्या पिंपळनेर युनिटच्या २४ वा ऊस गाळप हंगाम प्रारंभ गुरुवारी सकाळी उपाध्यक्ष वामनराव उबाळे यांच्या हस्ते तर करकंब युनिटमधील ऊस गाळप हंगाम प्रारंभ संचालक पोपट चव्हाण यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून झाला. संचालक लाला व सुगंधाताई मोरे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा कारखाना कार्यस्थळावर झाली. सोलापूर जिल्हा दूधसंघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे उपस्थित होते. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही साखर कारखाना युनिटची यशस्वी घौडदौड सुरू आहे असे उपाध्यक्ष उबाळे म्हणाले.

गेल्यावेळी पिंपळनेर युनिटमध्ये १८,९२,९४९ मेट्रीक टन उसाचे गाळप होऊन ११ टक्के साखर उताऱ्याने १९,२८,८५० क्विंटल साखर पोती उत्पादित झाली. तर करकंबमध्ये ६,२५,८८८ मेट्रीक टन उसाचे गाळप होऊन ११. १४ टक्के साखर उताऱ्याने ६,६३,९०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. एकूण २५,१८,८३७ मेट्रीक टन गाळप होऊन २५,९२,७५० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे अशी माहिती प्रशासनाने दिली. यावेळी कारखान्याचे संचालक रमेश येवलेपाटील, शिवाजी डोके, लक्ष्मण खुपसे, लाला मोरे, सचिन देशमुख, पांडुरंग घाडगे, पोपट चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here