बेळगाव / कोल्हापूर : कर्नाटकातील साखर कारखाने चालू होऊन १२ दिवस उलटले तरी अजून गाळपाला गती नाही. सध्या जिल्ह्यातील कारखान्यांची आकडेवारी पाहिली तर ती कमीच आहे. हा हंगाम गतीने सुरू नसल्याचे स्पष्ट आहे. महाराष्ट्रातील मजूर न आल्यामुळे हंगामाला अजून गती आलेली नाही. महाराष्ट्रातील निवडणुकीचे नुकतेच मतदान झाल्याने आता हळूहळू तेथील मजूर साखर कारखान्यांकडे येऊ लागतील. तर अलीकडे या भागात चांगला पाऊस झाल्याने काळ्या मातीतील तोडण्यांना अजून सुरुवात झालेली नाही. मशीन तोडणीही शांत आहे. त्याचा परिणाम कारखान्यांवर होत आहे.
कर्नाटकातील सर्व साखर कारखाने चालू झाले आहेत. कारखाने लवकर सुरू केले असले तरी गाळप क्षमतेइतका ऊस आणणे हे कारखान्यांना आव्हान पेलावे लागत आहे. माळरानातील मिळेल तो ऊस आणून गाळप करण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या गाळपाच्या तुलनेत साखर उत्पादनही कमी आहे. महाराष्ट्रातील कारखानदार निवडणुकीत गुंतल्याचा आणि ते निकालानंतर, २३ नोव्हेंबरनंतरच कारखान्यांच्या गाळपाकडे लक्ष देतील अशी शक्यता असल्याने कर्नाटकातील कारखान्यांच्या पथ्यावर हा हंगाम पडला आहे.
सीमाभागात २८ साखर कारखाने आहेत. यंदा ८ नोव्हेंबरपासून गळीत हंगामाला प्रारंभ झाला. सर्व कारखान्यांकडून आजवर एक लाखभर टन उसाचे गाळप झाले आहे. चार-पाच कारखान्यांनी दराची घोषणा केली आहे. केंपवाडच्या अथणी शुगर्सचे अध्यक्ष श्रीमंत पाटील म्हणाले की, अथणी शुगर्स साखर कारखान्याच्या नियोजनानुसार ऊस तोडणी मजूर दाखल झाले आहेत. आता हंगाम गतीला लागला आहे. तर दोन वर्षांपासून साखर विक्री व इथेनॉलचे दर स्थिर आहेत. ते वाढवावेत, अशी मागणी कारखानदारांनी केंद्र सरकारकडे केली आहे असे उगार शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर चंदन शिरगावकर यांनी सांगितले.