कोल्हापूर : यंदाच्या हंगामात सहा लाख मे.टन उसाचे गाळप, १२.५० चा सरासरी साखर उतारा करण्याबरोबरच मंडलिक साखर कारखाना सर्वांच्या बरोबरीने उसाला दर देणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी खासदारसंजय मंडलिक यांनी केले. कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामप्रारंभी ते बोलत होते.
यावेळी व्हाईस चेअरमन शिवाजीराव इंगळे, संचालक मंडळ आणि मान्यवरांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री सत्यनारायणाची पूजा संचालक महेश घाटगे आणि युगंधरा घाटगे यांच्या हस्ते झाली. चेअरमन मंडलिक म्हणाले, कारखान्याने मॉडिफिकेशन केल्यामुळे दररोज पाच हजार मे. टन गाळप होणार आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे.येत्या काळात तालुक्यात मंडलिक पर्व निर्माण होईल, असे वातावरण तयार झाले आहे. यापुढे नव्या पिढीला राजकारणात स्थान, ताकद देणार असून तालुक्यात मंडलिक पर्वाचे नवे पान लिहिण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही संजय मंडलिक यांनी केले.