वाळूज : तालुक्यातील दोन्ही साखर कारखान्यांनी ऊस तोडणी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यापासून ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या वाळूज परिसरात दाखल झाल्या आहेत. वाळूजच्या विविध भागात ऊसतोड टोळ्यांनी आपले बस्तान बसविले. गेल्या आठवड्यापासून ऊसतोड टोळ्या फडात सर्रास ऊसतोड करीत आहेत. अनेक बागायतदारांच्या ऊसतोडी होऊन पूर्ण वाहतूकही झाली. मात्र, गंगापूर सहकारी साखर कारखाना किंवा धामोरी शुगर मिल साखर कारखान्यांनी अद्याप उसाचा दर काय देणार, याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत संतप्त भावना आहेत. तालुक्यातील या दोन्ही साखर कारखान्यांनी तातडीने उसाचा दर जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पूर्वी तालुक्यात धामोरी शुगर मिल हा एकच साखर कारखाना होता. मात्र, गेल्या वर्षीपासून तालुक्यातील गंगापूर सहकारी साखर कारखानाही सुरू झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत उत्साह आहे. यंदा परिसरात उसाचे क्षेत्र कमी आहे. परिणामी, आपल्यालाच जास्त प्रमाणावर ऊस मिळावा, या आशेने दोन्ही साखर कारखान्यांनी बहुतेक ऊस पिकाच्या नोंदी केल्या आहेत. यंदा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ नोव्हेंबरला गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली. त्यानंतर ऊसतोडीला सुरवात केली गेली. याबाबत मेंदीपूरचे शेतकरी फकिरचंद जाधव म्हणाले की, माझ्याकडे उसाचे चार एकर क्षेत्र तोडीला आले आहे. परंतु, साखर कारखान्यांकडून अद्याप उसाचा दर जाहीर केलेला नाही. तो जाहीर केल्यानंतरच मी ऊसतोड लावणार आहे. तर धामोरी शुगर मिलचे शेती अधिकारी नंदकुमार कुंजर म्हणाले की, गेल्यावर्षी धामोरी शुगर मिलने उस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे एकरकमी दोन हजार सातशे रुपयांचा दर दिला होता. यंदा हा दर साधारण २५ नोव्हेंबरनंतर जाहीर होईल, असे वाटते.