कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ‘आजरा’, ‘वारणा’, ‘दालमिया’, ‘डी. वाय. पाटील’, ‘शाहू’, ‘कुंभी’, ‘ओलम अॅग्री’ या कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. उर्वरित कारखाने दोन दिवसांत सुरू होणार आहेत. अद्याप एकाही कारखान्याने ऊस दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे ऊस दराचे काय ? असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे. सद्यस्थितीत एफआरपी एकरकमी देण्याची तयारी बहुतांशी साखर कारखान्यांनी केल्याचे दिसते.
स्वाभिमानीने ऊस परिषदेत प्रतिटन ३४०० रुपयांची मागणी केली असून, त्यांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा १२.५० टक्के राहिला आहे. या उताऱ्यानुसार प्रतिटन ३२०० रुपयांपर्यंत दर मिळू शकतो. उसाचा तुटवडा, कारखान्यांतील स्पर्धा आणि साखरेला प्रती क्विंटल मिळत असलेला ३४०० रुपये दर पाहता एकरकमी एफआरपी देण्यात कारखान्यांना फारशी अडचण येणार नाही. एफआरपीनुसार विचार केला, तर प्रतिटन तीन हजार रुपयांच्या पुढेच पहिली उचल मिळू शकते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.