नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सहकार क्षेत्राच्या माध्यमातून करोडो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे. सहकाराच्या माध्यमातून देशाला स्वावलंबी बनवण्याचे काम करत असून, यात NCDC ची भूमिका महत्त्वाची आहे. सहकारी साखर उद्योगाला राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या (NCDC) माध्यमातून अधिक क्षमतावान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी NCDC कडून साखर कारखानदारीला पंचवार्षिक २५ हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, असे प्रतीपादन केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केले. एनसीडीसीच्या ९१ व्या सर्वसाधारण परिषदेत ते बोलत होते. को-ऑपरेटिव्ह इंटर्न स्कीम सहभागींना अमूल्य अनुभव मिळविण्यात मदत करते, त्यांना सहकार्याची तत्त्वे पुढे नेण्यासाठी आणि ग्रामीण समुदायांच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी तयार करते असे ते म्हणाले.
अमित शहा यांनी साखर कारखान्यांच्या आर्थिक क्षमतेला चालना देण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक पंचवार्षिक योजना तयार करण्याचा प्रस्ताव दिला. या माध्यमातून कारखान्यांचा निधी २५००० कोटींपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे सांगितले. यातून साखर उद्योगाची वाढ आणि शाश्वतता वाढवणे, सुधारित आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे आणि क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासास पाठिंबा देणे अपेक्षित आहे. सहकार चळवळीतील एनसीडीसीच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले आणि लाखो सहकारी संस्थांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. अमित शाह म्हणाले की ॲप-आधारित कॅब कोऑपरेटिव्ह सोसायटी सेवा स्थापन करण्याची गरज आहे, ज्यामुळे नफा थेट चालकांना वितरित केला जाईल. सहकारी संस्थांचे एकत्रिकरण करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी डेटाबेसच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही त्यांनी भर दिला.