धाराशिव : धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील भैरवनाथ शुगर संचलीत तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोहळा उत्साहात झाला. कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत यांच्या हस्ते सोमवारी (दि. २५) सपत्नीक बॉयलर अग्नीप्रदीपन व विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यकारी संचालक केशव सावंत म्हणाले, कारखान्यातील सर्व मशिनरीची कामे पूर्ण केली आहेत. कारखाना ७ हजार मेट्रीक टन क्षमतेने चालेल. कारखान्याकडून ऊस तोडणी यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. भैरवनाथ शुगर संचलीत तेरणा कारखान्यास धाराशिव, कळंब व तुळजापूर परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चालु गळीत हंगामात भैरवनाथ शुगरला ऊस मोठ्या प्रमाणात द्यावा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
भैरवनाथ शुगरचे सर्वेसर्वा तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी तेरणा कारखाना हा जिल्हा बँकेकडून भैरवनाथ शुगरने चालविण्यास घेतल्यानंतर पहिल्याच हंगामात कारखान्याने तब्बल ३ लाख १२ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले. गाळप केलेल्या ऊसाला सर्वाधिक २ हजार ८२५ रुपये प्रति टन उच्चांकी ऊस दर दिला. यावेळी उपसरपंच अमोल समुद्रे म्हणाले, ११ वर्षापासून बंद असलेला तेरणा कारखाना भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून चालु झाला आहे. त्यामुळे ढोकी परिसराचे अर्थकारण बदलले आहे. कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ, मजुर फेडरेशन माजी चेअरमन गफार काझी, पंचायत समितीचे माजी सदस्य संग्राम देशमुख, अमोल पाटील, सतीश देशमुख, राजपाल देशमुख, दत्ता तिवारी, सुभान इनामदार, राहुल पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, ठेकेदार, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.