कोल्हापूर : कर्नाटकातील गुळाचा स्वतंत्र सौदा काढण्याचा निर्णय

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी सोमवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत गुळाला कमी दर मिळू लागल्याने सौदे बंद पाडले. त्यामुळे बाजार समितीत ५० हजार गूळ रवे पडून राहिले. त्यानंतर सभापती प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सौद्यांवेळी गुळाला ३,८०० रुपयांपेक्षा कमी दर मिळाल्यास त्या गुळाचा सौदा रद्द करावा, असा निर्णय घेण्यात आला. तसेच उद्यापासून नियमित सौदे काढण्याचेही या बैठकीत ठरले. या बैठकीत कर्नाटकातून आवक होणाऱ्या गुळाचा स्वतंत्र सौदा काढावा असाही निर्णय घेण्यात आला.

दीपावलीपूर्वी गुळाला ४,००० ते ४,८०० रुपये प्रती क्विंटल दर होता. दीपावली पाडव्याच्या सौद्यामध्ये ४,३०० ते ५,६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. त्यानंतर गुळाचे दर कमी होऊ लागले. सोमवारी काढलेल्या गूळ सौद्यामध्ये ३,५०० ते ३,६०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी एकत्र येत सौदे थांबवले. जोपर्यंत ३,८०० रुपये प्रती क्विंटलच्या पुढे दर मिळत नाही तोपर्यंत सौदा काढायचा नाही, असा शेतकऱ्यांनी निर्धार केला. सचिव जयवंत पाटील यांनी याची दखल घेत शेतकऱ्यांना बाजार समितीत बैठकीसाठी बोलावले. ज्येष्ठ संचालक भारत पाटील-भुयेकर, शेतकरी अमित पाटील, दिलीप पाटील (खुपीरे), दिलीप आंबेकर ( वडणगे) यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी दर कमी मिळाल्यास सौदा रद्द करण्याचा निर्णय झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here