कोल्हापूर : जिल्ह्यातून गुळाची आवक कमी असताना, प्रत्यक्ष बाहेर जाणारा गूळ जास्त कसा? असा प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांना पडला आहे. काही व्यापारी कर्नाटकचा गूळ खरेदी करून तो कोल्हापुरातील असल्याचा शिक्का मारून अन्य राज्यात विक्रीला पाठवतात असा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला आहे. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर गुळ सौदे बंद पाडण्यात आले. तूर्त यावर तोडगा निघाला असला तरी कर्नाटकातून आलेल्या आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या गुळाला स्थानिक शेतकऱ्यांचा अजिबात विरोध नाही. त्यांनी तो गूळ खरेदी करावा; पण त्यावर कोल्हापूरचा शिक्का मारून तो विकू नये, अशी गूळ उत्पादकांची मागणी आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी सांगितले की, कोल्हापुरातील गुळाची चव, रंग आणि अन्य दर्जा बघून सौदे निघतात. त्यात बहुतांशी व्यापारीच या गुळाचे दर ठरवतात. पण, कर्नाटकातून येणारे गुळाने भरलेले ट्रक थेट व्यापाऱ्यांच्या गोदामात उतरले जातात. त्याचा सौदा निघत नाही किंवा त्याची चवही बघितली जात नाही. दर्जाच न तपासता हा गूळ व्यापारी थेट खरेदी करतात. खरेतर सकस जमीन, चांगला ऊस आणि गूळ तयार करताना घेतली जाणारी खबरदारी यामुळे कोल्हापूरच्या गुळाला राज्यस्थान, गुजरातमध्ये मोठी मागणी आहे. पण, काही व्यापाऱ्यांकडून कर्नाटकच्या गुळावर कोल्हापूरचा ‘ब्रेड’ लावून तो बाहेर पाठवला जातो. याबाबत बाजार समिती सभापती प्रकाश देसाई यांनी सांगितले की, शेतमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेऊ. झोनबंदी नसल्याने कर्नाटकातील गूळ खरेदी करण्याची व्यापाऱ्यांना मुभा आहे. विक्रीसाठी जाणाऱ्या गुळावरील ‘सेस’ फक्त समितीकडे जमा होतो.