हिंगोली : जिल्ह्यातील पुर्णा, टोकाई आणि बाराशीव या तीन कारखान्यांपैकी पुर्णा व बाराशीव कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केला आहे. मात्र, वसमत तालुक्यातील टोकाई कारखान्याचा गळीत हंगाम लांबणीवर पडला आहे. ऊस गाळप सुरू केलेल्या कोणत्याही कारखान्याने अद्याप दर जाहीर केलेला नसल्यामुळे शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत. उसाला प्रती टन तीन हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याविषयी काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षी पाऊस नसल्याने या हंगामात ऊस क्षेत्र कमी झाले आहे. जिल्ह्यात १० हजार ६३५ हेक्टर क्षेत्रापैकी चार हजार हेक्टरवर उसाची लागवड असून ती एकट्या वसमत तालुक्यातील आहे. सद्यस्थितीत पूर्णा व बाराशीव कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक आठवडा होत आला आहे. मात्र, कारखानदारांकडून दर जाहीर न केल्याने कोंडी कायम आहे. तर, गूळ पावडर कारखान्यांनी २ हजार ५०० रुपये प्रतिटन दर जाहीर केला आहे. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील कारखाना नांदेड जिल्ह्यातील भाऊराव पाटील कारखान्याने विकत घेतला आहे. या कारखान्याकडून जिल्ह्यातील ऊस खरेदी करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा भागात असलेला टोकाई कारखाना सहयोग तत्त्वावर आहे. मात्र, अद्यापही कारखाना सुरू झाला नाही.