कोल्हापूर : यंदा झालेल्या अत्याधिक पावसाचा परिणाम ऊस पिकावर झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः परतीच्या पावसामुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ राहिल्याने उसाच्या वजनात घट झाल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांना किमान १५ ते २० टक्के आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.अधिक दिवस ओलावा राहिल्याने उसाची वाढ कमी झाली आहे. शिवाय पाने पिवळी दिसू लागली आहेत. अशा पिकाची तोडणी झाल्यानंतर वजनात घट झाल्याचे दिसत आहे. सदरची घट सरासरी १५ ते २० टक्के आहे.
उसाच्या वजनात येत असलेल्या घटीचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसणार आहे असे नाही, तर ऊस तोडणी, वाहतूकदारांनाही त्याची झळ बसणार आहे. कारखान्यांनी गतवर्षीच्या व्यवसायानुसार वाहतुकदारांना अॅडव्हान्स दिले आहेत. त्यांनी ऊस तोडणी टोळ्यांना रक्कम अदा केली आहे. पण, उसाच्या वजनात घट येत असल्याने दरवर्षीप्रमाणे व्यवसाय होण्याची शक्यता कमी आहे. सहाजिकच याचा फटका तोडणी- वाहतूकदारांनाही बसणार आहे.उसाची लवकर तोड करावी म्हटले तर यंदा ऊस गळीत हंगामच उशिरा सुरू झालेला आहे. साहजिकच उसाच्या तोडीलाही विलंब होणार आहे. त्याचाही परिणाम उसाच्या वजनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.