सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा, २०२४-२५ मधील गळीत हंगाम १७ नोव्हेंबर रोजी सुरू झाला. आतापर्यंत ३६,०५० टन उसाचे गाळप झाले. २८ हजार ८८८ क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली. कारखान्यात उत्पादित झालेल्या २८ हजार ८८८ व्या साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कारखाना प्रती दिन ५ हजार टनाप्रमाणे यंदाचे साडेसहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कारखान्याचे १२.५० टक्क्यांहून अधिक साखर उताऱ्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष नायकवडी म्हणाले की, उताऱ्यासाठी आवश्यक महत्त्वाच्या कालावधीत कारखाना सुरू झाला आहे. शेती विभागाने एक फेब्रुवारीपासून पुढे पूर्ण क्षमतेने पुरेसा ऊस पुरवठा व्हावा यासाठी आतापासूनच आवश्यक ते सर्व नियोजन करावे. करार केलेली, अॅडव्हान्स घेतलेली संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा हजर ठेवावी. त्यांना पुरेसे काम देऊन त्यांच्या येणेबाकीची वसुली होणे महत्वाचे आहे. यावेळी हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, कार्यकारी संचालक राम पाटील, दिनकर बाबर, अजित वाजे, वीरधवल नायकवडी, केदार नायकवडी आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.