जमिनीत ओलावा राहिल्याचा ऊस पिकाला फटका : वजनात घट, एकरी उत्पादनही कमी

कोल्हापूर : यंदा परतीच्या पावसामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहिला आहे. याचा थेट फटका ऊसाच्या वजनावर होणार आहे. एकरी किमान ५ टनांनी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उसाची वाढ खुंटली असून आता पाने पिवळी दिसू लागली आहेत. आडसाली लावणींवर मावा आणि तांबडा रोग पडत आहे. अशा पिकाच्या तोडणीनंतर वजनात घट झाल्याचे दिसत आहे. पाऊस अधिक झाल्याचा हा परिणाम ऊस पिकावर झाल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

यंदा ऊस गळीत हंगामच उशिरा सुरू झाला आहे. साहजिकच उसाच्या तोडीलाही तितकाच विलंब होणार हे निश्चित आहे. त्याचाही परिणाम उसाच्या वजनावर होण्याची शक्यता आहे. उसाची पाने आताच पिवळी दिसू लागली आहेत. उसाची लवकर तोड करावी म्हटले तर ते शक्य नसल्याची स्थिती आहे. वजनात येत असलेल्या घटीचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसणार नाही तर ऊस तोडणी, वाहतूकदारांनाही त्याची झळ बसणार आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असलेल्या ऊस पिकावर पसरत चाललेल्या रोगामुळे नुकसान सहन करावे लागणार आहे.

गडहिंग्लज विभागातही ऊस वजनात घट होण्याची शक्यता

अत्याधिक पावसाचा परिणाम ऊस पिकावर झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः परतीच्या पावसामुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ राहिल्याने उसाच्या वजनात घट झाल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांना किमान १५ ते २० टक्के आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.अधिक दिवस ओलावा राहिल्याने उसाची वाढ कमी झाली आहे. शिवाय पाने पिवळी दिसू लागली आहेत. अशा पिकाची तोडणी झाल्यानंतर वजनात घट झाल्याचे दिसत आहे. सदरची घट सरासरी १५ ते २० टक्के आहे.

उसाच्या वजनात येत असलेल्या घटीचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसणार आहे असे नाही, तर ऊस तोडणी, वाहतूकदारांनाही त्याची झळ बसणार आहे. कारखान्यांनी गतवर्षीच्या व्यवसायानुसार वाहतुकदारांना अॅडव्हान्स दिले आहेत. त्यांनी ऊस तोडणी टोळ्यांना रक्कम अदा केली आहे. पण, उसाच्या वजनात घट येत असल्याने दरवर्षीप्रमाणे व्यवसाय होण्याची शक्यता कमी आहे. सहाजिकच याचा फटका तोडणी-वाहतूकदारांनाही बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here