मनिला : या आठवड्यात साखरेच्या किमतीत (सरासरी १०० पेसोस प्रती ५० किलोग्रॅम बॅग) मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने साखर शेतकरी धास्तावले आहेत. साखर नियामक प्रशासन आणि कृषी विभागाने हस्तक्षेप करण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. युनायटेड शुगर प्रोड्यूसर्स फेडरेशन (युनिफेड) चे अध्यक्ष मॅन्युएल लामाता म्हणाले की, कोणीतरी बाजाराशी खेळ करत आहे. साखरेच्या किमतीतील घसरण रोखण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करणे अत्यंत आवश्यक आहे.
लामाता म्हणाले की, “आम्ही कृषी विभाग (डीए) आणि साखर नियामक प्रशासन (एसआरए) यांना शक्य तितक्या लवकर हस्तक्षेप करण्याची विनंती करीत आहोत. आमच्याशी खेळणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्याची मागणी करीत आहोत. मोठा नफा कमावण्याची इच्छा असलेल्या व्यापाऱ्यांकडून कृत्रिम किंमत ठरवली जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या गुरुवारी साखरेची सरासरी किंमत २,५०० पेसो होती, असे लामता यांनी सांगितले. मात्र, शेतकऱ्यांना साखरेची किंमत प्रती बॅग २,८०० पेसो होईल अशी आशा होती.
साखर परिषद, नॅशनल फेडरेशन ऑफ शुगरकेन प्लांटर्स (एनएफएसपी), कॉन्फेडरेशन ऑफ शुगरकेन प्रोड्यूसर्स (CONFED) आणि पनाय फेडरेशन ऑफ शुगरकेन फार्मर्स (PANAYFED) आणि फिलीपिन्सच्या साखर उद्योगातील नॅशनल काँग्रेस ऑफ युनियन्स ( NACUSIP) यांचा समावेश आहे. साखरेच्या दरात घसरण का होत आहे याचे स्पष्टीकरण यापूर्वी एसआरएकडून मागवण्यात आले होते.
गाळप हंगामाच्या सुरुवातीपासूनच किमती अनियमितपणे कमी होत आहेत आणि वाढत आहेत. लामाता म्हणाले की, मागणी आणि पुरवठा डेटाच्या विसंगतीने, अलीकडील घटनांमधून असे दिसते की कोणीतरी नफा मिळवण्यासाठी असा प्रकार करीत आहे. सद्यस्थितीत साखरेच्या शुद्धतेचा प्रश्नदेखील आहे. दीर्घ दुष्काळामुळे तो कमी झाला आहे. अशा स्थितीत साखरेचे दर आरामदायी पातळीवर राखण्यासाठी आम्हाला डीए आणि एसआरएच्या हस्तक्षेपाची गरज आहे. तरच शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल.
ते म्हणाले, जर सरकारने पुढाकार घेतला तर आम्ही थेट सरकारला विक्री करू आणि ते थेट जनतेला विकू शकतील. भाव स्थिर होईपर्यंत या व्यापाऱ्यांना संपवू. आम्हाला भीती वाटते की दरातील या सततच्या घसरणीचा आमच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होईल. अल्पभूधारकांची संख्या ८० टक्क्यांहून अधिक आहे. ते प्रदीर्घ दुष्काळाशी सामना करून हंगाम चांगला होण्याची आशा करत आहेत.