सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जिल्ह्यातील विठ्ठल व विठ्ठलराव शिंदे या दोन्ही साखर कारखान्यांनी प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर देण्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांनीही तेवढा दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. केंद्र सरकारने पुणे विभागासाठी १०.२५ टक्के आधारभूत साखर उतारा निश्चित केला आहे. त्यानुसार प्रतिक्विंटल ३४० रुपये किफायतशीर दरानुसार प्रतिटन तीन हजार ४८५ रुपये दर ठरविला आहे. आता गळीत हंगाम सुरू होऊन बराच काळ लोटला तरी ऊस दराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
कारखान्यांचे धुराडे पेटून १५ दिवस होऊनही कारखानदारांनी ऊसदराबाबत मौन बाळगल्याने लवकर ऊसदर जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत शेतकरी संघटनाही मूग गिळून गप्प असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अद्याप कोणीही दर निश्चित न केल्याचे चित्र आहे. याबाबत टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक म्हणाले की, पुढील दोन दिवसांत बैठक घेऊन ऊसदर निश्चित केला जाईल. त्यानंतर ते जाहीर करण्यात येईल. लवंगी (ता. मंगळवेढा) येथील भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत म्हणाले की, सदर हा साखर दरावर ठरतो. मात्र, सध्या तसे पूरक वातावरण नाही. जिल्ह्यातील अन्य कारखाने जे दर देतील तो दर देऊ. निवडणुकीमुळे ऊसदर निश्चित करता आला नाही. याबाबत बैठक घेऊन ठरवण्यात येईल. त्यानंतर ऊसदर जाहीर करण्यात येईल.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.