जालना : गुळ उद्योगावर संकट, दर उतरल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत

जालना : दररोज भाव कमी होत असल्याने गुळ उद्योगांवर संकट आले आहे. आजघडीला गुळापेक्षा साखर महाग आहे. डिसेंबर महिन्यात गुळाचे भाव वाढतील, अशी उत्पादकांना आशा होती. मात्र तसे झालेले नाही. गेल्या महिनाभरापासून गुळाचे दर घसरत असून बाजारात मालाला मागणीही नाही. गुळाला २,९०० रुपये तर गूळ पावडरला २,६०० रुपये असा भाव आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चून उभारलेल्या गूळ उद्योगांना मंदीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आणखी १००-१५० रुपयांनी दर घसरता तर उद्योग बंद केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ऑक्टोबर महिन्यात जालन्याच्या बाजारात गुळाला ३,४०० रुपये क्विटंलचा भाव होता. नाथनगरच्या ज्ञानेश्वर नैसर्गिक गूळ उद्योगाने जालन्याच्या बाजारात सर्वप्रथम नवा गूळ आणला होता. डिसेंबर महिन्यात गुळाचे भाव घसरले. त्यामुळे गूळ उत्पादक अडचणीत सापडले आहेत. साखरेचे मात्र ३,९०० रुपये क्विंटल आहेत. संक्रांतीच्या तोंडावर गुळाचे भाव वाढतात. यावर्षी मात्र गुळाचे भाव घसरायला सुरुवात झाली आहे. शेतकरी राम मुरुमकर यांनी सांगितले की, आत्तापर्यंत ११० टन माल विकला. सुरुवातीला चांगला दर मिळाला. आता मात्र दर घसरल्याने या उद्योगावर संकट आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here