कोल्हापूर : चालू गळीत हंगामातील उसाला ३,७०० रुपये पहिली उचल द्यावी आणि मागील गळीत हंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये द्यावेत या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनात कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू राहिले. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या अध्यक्षतेखाली जवाहर, शरद, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना, श्री दत्त व गुरुदत्त, ‘आंदोलन अंकुश’ चे कार्यकर्ते आणि प्रादेशिक सहसंचालक साखर विभागाचे प्रतिनिधी यांची तहसीलदार यांच्या दालनात बुधवारी बैठक झाली. मात्र, निर्णय झालेला नाही.
शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील पाच साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘आंदोलन अंकुश’चे राकेश जगदाळे, दीपक पाटील, उदय होगले, भूषण गंगावणे यांनी ऊस उत्पादकांची बाजू मांडली. मागील हंगामातील उसाला प्रती टन २०० रुपये व चालू गळीत हंगामात येणाऱ्या उसाला ३ हजार ७०० रुपयांची मागणी केली. कारखान्यांच्या प्रतिनिधींनी या दोन्ही मागण्यांबाबत आपल्याला अधिकार नसल्याने ही मागणी संचालक मंडळाची बैठक ३ दिवसांमध्ये घेऊन निर्णय दिला जाईल, अशी भूमिका घेतली. पूरबाधित ऊस प्राधान्याने तोडणे, क्रमपाळीनुसार उसाची तोड, ऊसतोड मजुरांनी शेतकऱ्याकडून खुशाली मागितल्यास त्यांच्यावर कारवाई आदी मागण्या कारखान्यांच्या प्रतिनिधींनी मान्य केल्या. तहसीलदार अनिलकुमार हेळकर व शिरोळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी चुडमुंगे यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले.