कोल्हापूर : ऊस दरप्रश्नी साखर कारखानदार, शेतकरी संघटना यांची 9 डिसेंबरला बैठक

कोल्हापूर : मागील ऊस दरातील फरक व चालू हंगामातील पहिली उचल प्रतिटन ३७०० रुपये मिळावी या मागणीसह अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी साखर कारखानदार, शेतकरी संघटना यांची बैठक सोमवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ताराराणी सभागृहात ही बैठक होईल.

जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना, जयसिंगपूर येथे झालेली ऊस परिषद यामध्ये मागील २०२३-२४ या गळीत हंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये अंतिम हप्ता व सध्याचा २०२४-२५ या गळीत हंगामासाठी पहिली उचल प्रतिटन ३७०० रुपये मिळावी, अशी मागणी केली आहे. तोडणीसाठी मजुरांकडून व ऊस तोडणी मशिन मालकांकडून एकरी ५ ते १० हजार रुपयांची मागणी करून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. या सर्व विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी साखर कारखानदार, शेतकरी संघटना प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी केले आहे.

साखर कारखान्यांकडून ऊसतोड महामंडळाकडे ३५ कोटी जमा

राज्यातील साखर कारखान्यांकडून गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे यंदाच्या २०२४-२५ चा ऊस गाळप परवाना प्राप्त करण्यापूर्वी वर्ष २०२१-२२ मधील देय रक्कम ३९.६४ कोटींपैकी आतापर्यंत सुमारे ३५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महामंडळाकडे पुरेसा निधी गोळा करून देण्यात साखर आयुक्तालयाने चांगली भूमिका घेतली आहे. महामंडळास आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी कारखान्यांनी गाळप केलेल्या उसावर प्रतिटन १० रुपये देण्याचा निर्णय झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here