कोल्हापूर : सध्या राज्यात ऊस गाळप हंगाम वेगात सुरु आहे, पण त्यापेक्षा जास्त वेगात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लुट सुरु झाली आहे. शेतकऱ्यांकडे दीड-दोन वर्षे कष्टाने वाढवलेला ऊस तोडण्यासाठी एकरी पाच हजार तोडणी खर्च आणि पाच किलो चिकनची मागणी केली जात असल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी साखर आयुक्तांनी दिलेला आदेश आतातरी प्रत्यक्ष अमलात येणार का ? तोडणी यंत्रणेकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबणार का? असा सवाल उपस्थित केला जावू लागला आहे.
दीड वर्षे ऊसाच्या पिकाला सांभाळून गळीत हंगाम सुरु झाल्यावर तो कारखान्याला घालवायच्या वेळी शेतकऱ्याला प्रत्येकाच्या विनवण्या कराव्या लागतात. एवढे करूनही ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार यांना ‘बक्षीस’ द्यावे लागते. कोण म्हणतो 200 रुपये द्या तर कोण म्हणतो 500 रुपये द्या. कधी कधी शेतीगट कार्यालयातील कर्मचाऱ्याना जेवण द्यावे लागते. तक्रार निवारण अधिकारीच कारखाना शेती विभागतील असल्याने पाण्यात राहून मगरीशी वैर अशी अवस्था शेतकऱ्याची होत आहे.
गेल्यावर्षी ऊस गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार, ऊस तोडणी यंत्र यांच्याकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवा, असा सूचना साखर आयुक्त यांनी कार्यकारी संचालकांना केल्या होत्या. आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर चौकशी करून तक्रारीचे वेळीच निराकरण करावे. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास सदरची रक्कम मजूर, मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांच्या बिलातून वसूल करून संबंधीत शेतकऱ्यास अदा करावी, असे सांगण्यात आले होते.
शेतकऱ्यानों, ऊस तोडणीत लुट झाल्यास करा साखर आयुक्तालयाकडे तक्रार !
ऊसतोड मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी होत असल्यास कारवाई करण्याबाबत साखर आयुक्त कार्यालयाने ८ डिसेंबर २०२३ रोजी पत्र दिले होते. त्यानुसार साखर कारखान्याने याबाबतच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करून संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. तसेच साखर कारखान्यांकडून तक्रारींचे निराकरण न झाल्यास प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे यांच्या कार्यालयास विहित नमुन्यात rjdsugarpune@gmail.com या संकेतस्थळावर तक्रार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.