लातूर : मांजरा परिवारातील निवाडा (ता. रेणापूर) येथील रेणा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सध्या जोमात सुरू आहे. कारखान्याने शनिवार अखेरपर्यंत (ता. सात) ४८ हजार ५९० टन उसाचे गाळप करून ४० हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. यात ९.६० टक्के साखर उतारा मिळाला आहे. मांजरा परिवाराचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे.
अधिकाधिक ऊस उत्पादकांनी ऊस रेणा कारखान्यास गाळपास पाठवावा, असे आवाहन रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाइस चेअरमन अनंतराव देशमुख,कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे आदींनी केले आहे. चालू गाळप हंगामात गाळपास आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन २,७०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता बँक खात्यावर सोमवारी (9 डिसेंबर) जमा केला जाणार आहे. कारखान्याने हंगाम २०२४-२५ गळीतास आलेल्या उसाला एफआरपी ऊस दरापोटी प्रति टन २,७०० प्रमाणे ऊस बिल अदा करण्याचा निर्णय घेतला. निर्णयानुसार ता. २५ नोव्हेंबर ते ३० नोहेबरदरम्यान गळीतास आलेल्या उसाचे बिल सोमवारी बँकेत जमा केले जात आहे. ज्या ऊस उत्पादकांचा ऊस कारखान्यास गाळपास आलेला आहे, त्यांनी आपल्या बँक शाखेतून ऊस बिलाची रक्कम उचल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.