पुणे : यशवंत साखर कारखान्याची अतिरिक्त जमीन खरेदी करण्याचा पुणे बाजार समितीचा प्रस्ताव !

पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची अतिरिक्त सुमारे ९९.२७ एकर जमीन रेडीरेकनर किंमत ३३५ कोटी रुपये किंवा दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळ व शासनाच्या मान्यतेने कमी किमतीने उपबाजार आवाराकरिता खरेदी करण्याचा प्रस्ताव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने पणन संचालकांकडे दिलेला आहे. दरम्यान, यशवंत कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याची देणी देणे व भांडवल उभारणीसाठी स्वमालकीची ९९.२७ एकर जमीन एकूण ४०० कोटी रकमेस विक्री करण्याचा प्रस्ताव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीस ३० ऑक्टोबर २०२४ रोजी दिला होता.

दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे कि, जागा खरेदी करण्याकामी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या उपबाजार आवाराकरिता खरेदी करणेकामी दिलेल्या प्रस्तावास महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनयमन) अधिनियम १९६३ मधील कलम १२ (१) नसार मंजरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव १८ नोव्हेंबरला पणन संचालनालयास दिलेला आहे. शेतकऱ्यांना व बाजार घटकांना सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीस जागेची आवश्यकता असल्याने बाजार समितीने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून मौजे कोरेगांव मूळ (ता. हवेली, जि. पुणे) येथील १२ एकर जमीन ५३ कोटी १७ लाख ८८ हजार ७०४ रुपयांना दिनांक ७ ऑक्टोबर २०२२ रोजी खरेदी केलेली आहे. त्याला जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) यांनी दिनांक ५ जुलै २०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये दुय्यम उपबाजार आवार घोषित केलेला आहे.

थेऊरच्या जागा खरेदीसाठी निधी उपलब्धता व्हावी म्हणून कोरेगाव मूळ येथील उपबाजाराची जागा जाहीर लिलावाने पणन संचालकांच्या कलम १२ (१) अन्वये परवानगी घेऊन विक्री करणे आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन खरेदी करण्याबाबतचा निर्णय बाजार समितीने बहुमताने घेतल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. दैनिक ‘पुढारी’शी बोलताना पणन संचालक विकास रसाळ म्हणाले कि, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून घेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याकडील अतिरिक्त ९९.२७ एकर जमीन खरेदीचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. तसेच कोरेगाव मूळ येथील जमीन विक्रीला ही कायद्यातील कलम १२(१) परवानगी मागितली आहे. त्या प्रस्तावाच्या तपासणीअंती आम्ही ही जमीन खरेदी करण्यासाठी निधीची उभारणी कशी करणार? यासाठीचा विस्तृत तपशील समितीकडून मागितला आहे. त्यानंतरच याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here