सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी उसाची पहिली उचल जाहीर करीत ऊस दराची कोंडी फोडली. त्यानंतर जिल्ह्यातील राजारामबापू साखर कारखाना आणि श्री दत्त इंडिया’नेही दर जाहीर केला आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी प्रतिटन ३२०० रुपये तर ‘दत्त इंडिया’ने प्रतिटन ३ हजार १५० रुपये दर जाहीर केला आहे. आता अन्य कारखानदारांच्या भूमिकेकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आहे. सांगली जिल्ह्यात राजारामबापू साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी, तिपेहळ्ळी (जत), हुतात्मा, क्रांतिअग्रणी, सोनहिरा, रायगाव, श्री दत्त इंडिया, श्री श्री रविशंकर, दालमिया शुगर, मोहनराव शिंदे आरग, विश्वास चिखली, यशवंत खानापूर, एसईझेड तुरची, उदगिरी श्रीपती शुगर डफळापूर हे कारखाने सुरू आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील काही संघटनांनी उसाला पहिली उचल ३५०० मिळालीच पाहिजे. अशा घोषणाबाजी आंदोलन सुरू केले आहे. जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनने गतवर्षी गाळप झालेल्या उसाचे उर्वरित २०० रुपये आणि चालू हंगामात जाणाऱ्या उसाला प्रतिटन ३७०० रुपयांची एकरकमी एफआरपी घेण्याचा निर्धार केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेट्टी यांनी चालू उसाला ३७०० रुपये दर मागितला आहे. जर मागील पैसे आणि यंदाचा दर जाहीर न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. गतवर्षी बहुतांश कारखान्यांनी एफआरपी देण्याचा प्रयत्न केला. परंतु गतवर्षीच्या साखरेला जादा दर मिळाल्याने ‘स्वाभिमानी’सह अन्य शेतकरी संघटनांनी मागील दर ३५०० ते ३७०० रुपये भाव मिळाला पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.