पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद मांडकी (ता. पुरंदर) गावचे प्रयोगशील शेतकरी दीपक अनिल सावंत व जयंत अनिल सावंत यांनी चालू हंगामामध्ये एकरी १०२ टनाचे उत्पन्न घेतले आहे, अशी माहिती सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक विश्वास जगताप यांनी दिली. २२ नोव्हेंबर ते २६ या कालावधीत शिवारातील उसाची तोड गाळपासाठी करण्यात आली. त्यामध्ये सावंत यांनी ऊस उत्पादन वाढीचा केलेला विक्रम ऊस विकास विभागाने सर्वांच्या समोर आणला आहे. तो इतर ऊस उत्पादकांसाठी दिशादर्शक ठरणारा असल्याचे कृषी सहायक नंदकुमार विधाते यांनी सांगितले.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात अनेक प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकरी एकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करतात. यंदाही सुरू झालेल्या ऊस गाळप हंगामातही ही ऊस उत्पादकांची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत शिरपेचात तुरा लावणारी कामगिरी सावंत बंधूंनी केली आहे. दीपक सावंत व जयंत सावंत यांनी को-८६०३२ या जातीच्या उसाचे उत्तम नियोजन जैविक, सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य वापर करून एकरी १०२ टन विक्रमी उत्पादन काढले. सावंत यांना शेतकरी कृषी सेवा केंद्र मांडकीचे माधव जगताप, शेतकरी मित्र शिवाजी मोरे, सोमेश्वर कारखान्याचे अॅग्री ओव्हरशियर चंद्रकांत गायकवाड, कृषी पर्यवेक्षक माधवी नाळे, कृषी सहायक नंदकुमार विधाते, महेंद्र साळुंखे, धनंजय निगडे यांचे सहकार्य लाभले.