सांगली : सध्या ऊस तोडणीचा हंगाम जोरदार सुरू आहे. ऊस तोडणीसाठी शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जाते. परंतु राजारामबापू साखर कारखान्याने काढलेल्या नवीन परिपत्रकामुळे मिरज पश्चिम भागातील शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. राजारामबापू कारखान्याच्या सर्व युनिटमधील ऊस गाळपासाठी जर तोडणी कामगार, मुकादम अथवा वाहतूकदारांकडून पैशाची मागणी केल्यास व तसे निदर्शनास आल्यास संबंधित शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेली रक्कम ही वाहतूकदारांच्या बिलातून वसूल करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
राजाराम कारखान्याच्या या निर्णयाचे पश्चिम भागातील कृष्णा वारणा काठावरील शेतकऱ्यांतून जोरदार स्वागत होत आहे. मिरज पश्चिम भागातील कृष्णा वारणा काठावर उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, तुंग, कवठेपिरान, दुधगाव, माळवाडी व सावळवाडी या भागातील ऊस गाळपासाठी राजारामबापू साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिटमध्ये दिला जातो. मात्र, आता तोडणीसाठी ऊस तोडणी मुकादम वाहतूकदारांकडून पैशाची मागणी होत असल्याची चर्चा आहे. दहा हजार रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या काही हंगामापासून शेतकऱ्यांना हा त्रास सुरू आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. ही लुट आता थांबेल अशी अपेक्षा आहे. अशाच प्रकारे सर्व कारखान्यांनी आपापली भूमिका जाहीर करुन शेतकरी वर्गाला न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.