सांगली : राज्यात गळीत हंगामाने आता वेग घेतला आहे. गेल्या पंधरवड्यापासून गतीने गाळप सुरू झालेले आहे. सांगली जिल्ह्यात सर्व साखर कारखान्यांकडे ऊस तोडणीसाठी ५० हजारांवर मजूर दाखल झालेले आहेत. मात्र, ही संख्या पुरेशी नसल्याची स्थिती आहे. मजूर टंचाईमुळे गेल्या काही वर्षांपासून मजुरांऐवजी यंत्राद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यात ३०० हून अधिक यंत्रांद्वारे ऊसतोडणी होत आहे. शेतकरीही मजुरांऐवजी यंत्राच्या तोडणीला प्राधान्य देत आहेत. मोठ्या कारखान्यांकडे प्रत्येकी २५-३० यंत्रे, तर छोट्या कारखान्यांकडे १० ते १५ यंत्रे ऊसतोडणीचे काम वेगाने करत आहेत. यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मुख्य गळीत हंगाम राहण्याचा अंदाज असून ऊस दर प्रती टन ३१५०-३२०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गत वर्षीचा सरासरी साखर उतारा ११.५ टक्क्यांवर असून सर्वसाधारण १ कोटी ३ लाख क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे. यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात एक लाख ३७ हजार १०३ हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. जिल्ह्याची सरासरी हेक्टरी उत्पादकता ८३ टन आहे. मात्र, यंदा सततच्या पावसाने उसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. शेजारील कर्नाटकातील गळीत हंगाम गतीने सुरू आहे. त्यांच्याकडून ऊस पळवला जाईल या धास्तीने कारखान्यांनी ऊसतोड मजुरांसह यंत्राद्वारे ऊसतोडणी गाळप उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. बीड, धाराशिव, सोलापूर भागात सिंचनाची सोय, मुलांचे शिक्षण यामुळे आता मजुरांनाही तीन-चार महिने अन्य प्रदेशात ऊसतोडणीसाठी जाणे व्यवहार्य राहिले नाही. त्यामुळे दिवसोंदिवस मजुरांची संख्या कमी होत असल्याचे दिसते. दरम्यान, श्री दत्त इंडिया (वसंतदादा) कारखान्याचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी यंत्रासाठी अनुदान मिळाल्यामुळे राज्यभरात यंत्रांची संख्या वाढलेली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात प्रत्येक कारखान्याकडे किमान १५ ते २० यंत्रे आहेत. त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.