महाराष्ट्र : १० लाख ऊसतोड मजुरांसह मुकादमांना मिळणार सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ

कोल्हापूर:राज्य सरकारकडून ऊसतोड मजूर, वाहतूक कामगार, मुकादम व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यात येत आहे. ही योजना ऊस गाळप हंगामाच्या कालावधीसाठी लागू असून, या कालावधीत ऊसतोड मजूर, वाहतूक कामगार, मुकादम यांना किंवा त्यांच्या बैलांना केव्हाही अपघातामुळे मृत्यू अथवा अपंगत्व आले तरी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. राज्यातील १२७ सहकारी व १२९ खासगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये सुमारे १० लाख ऊसतोड मजूर काम करतात. त्यांना याचा लाभ मिळेल.

योजनेंतर्गत पात्रतेसाठी रस्ता रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य करण्याने विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदोष, जनावरांच्या हल्ल्यामुळे चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल तसेच अन्य कोणताही अपघात या अपघातांचा समावेश असणार आहे.

या योजनेमध्ये झोपडीला आग (१० हजार रुपये), वैयक्तिक अपघात मृत्यू (पाच लाख), वैयक्तिक अपघात अपंगत्व (अडीच लाख), वैयक्तिक अपघात वैद्यकीय खर्च (५० हजार), लहान बैलजोडी मृत्यू वा अपंगत्व (७५ हजार), मोठी बैलजोडी मृत्यू वा अपंगत्व (एक लाख रुपये) अशी मदत मिळणार आहे. मात्र, शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यवाहीत असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास संबंधित लाभार्थी या योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभास पात्र असणार नाही. याचबरोबर योजनेतील लाभार्थी तसेच बैलजोडी यांचे नोंदणीकरण डिजिटल रेकॉर्ड गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे केले असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here