अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात शंकरराव काळे कारखान्याने २,८०० रुपये ऊस दर जाहीर केला आहे. हा कारखाना वगळता अन्य सर्व कारखान्यांकडून अद्यापही दर जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. ऊस दराची कोंडी कधी फुटणार याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. दुसरीकडे सध्या साखरेचे दर मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. ज्या प्रमाणात एफआरपी वाढते, त्या प्रमाणात साखरेचे दर वाढत नसल्याने साखर कारखानदार सध्या अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे उसाचा दर जाहीर करणे कठीण झाल्याचे साखर कारखानदारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, गेल्या २० ते २५ दिवसांपासून जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाने गती घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा १९ कारखान्यांनी २४,३८,४९३ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून त्यापासून १८,५४,४०६ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात पारनेरमधील क्रांती शुगर या खासगी कारखान्याचा साखर उतारा १०.१७ टक्के असून अन्य एकाही कारखान्याचा उतारा १० टक्क्याच्या पुढे गेलेला नाही. सर्वात कमी साखर उतारा श्रीगोंद्यातील गौरी शुगर कारखान्याचा ६.९ टक्के आहे. साखर सहसंचालक शेखर बिडवई यांनी सांगितले की, साखरेचे दर कमी झाल्यामुळे कारखान्यांकडून दर जाहीर करण्यास विलंब होत आहे. मध्यतंरी सर्व कारखान्यांशी बोलणे झाले असून ते या किंवा पुढील आठवड्यात ऊसाचे दर जाहीर करणार आहेत. शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकची मागणी केली आहे. त्यानुसार ही बैठक देखील पुढील आठवड्यात होईल. लवकरच सर्व साखर कारखाने उसाचा दर जाहीर करणार आहेत.