अहिल्यानगर : राहुरी तालुक्यात १२ ते १३ हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातून नऊ ते दहा लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. प्रसाद शुगरतर्फे तालुक्यातील चार लाख टनांपर्यंत उसाचे क्षेत्र तोडले जाते. उर्वरित पाच ते सहा लाख टन ऊस तोडण्यासाठी जिल्ह्यातील प्रवरा, अशोक, संगमनेर, अगस्ती, संजीवनी, कोळपेवाडी, अंबालिका, क्रांती शुगर, कुकडी, साजन शुगर, मुळा, गौरी शुगर, तसेच पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर, पराग आदी साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या कार्यरत आहेत.मजुरांची लहान मुलेही ऊस तोडणीची कामे करताना दिसत आहेत. त्यामुळे उसाच्या फडात बालपण कोमेजून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्याची कामधेनू ठरलेला डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. वांबोरी येथील प्रसाद शुगर हा एकमेव साखर कारखाना सुरू आहे. येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांची संख्या जास्त आहे. उसाच्या फडात ऊसतोडणी मजुरांच्या हाताखाली त्यांची लहान मुले राबत असल्याची दृश्य सर्रास बघायला मिळत आहे. या मुलांचे शिक्षण खंडित होत आहे. शासनाने साखरशाळा बंद केल्या आहेत. ऊसतोडणी मजुरांच्या गावांमध्ये शासकीय वसतिगृह सुरू केले आहेत. परंतु ऊसतोडणी मजूर मुलांना वसतिगृहात ठेवण्यास तयार होत नाहीत. येथे आलेल्या मुलांचे बालपण उसाच्या फडात कोमेजून जात आहे. यापूर्वी साखर शाळा होत्या. त्यांच्यासाठी पुन्हा साखर शाळा सुरू कराव्यात अशी मागणी केली जात आहे.