नवी दिल्ली : इंडियन शुगर अँड बायोएनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) च्या वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४ (एजीएम)मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज आभासी पद्धतीने संवाद साधला. त्यांनी २०२५ च्या साखर आणि बायोएनर्जी रोडमॅपवर प्रकाशझोत टाकला. निर्यात वाढविणे आणि आणि इथेनॉलमधील भविष्यातील नाविन्यपूर्णतेचे महत्त्व यातील साखर उद्योगाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली.
एजीएमला संबोधित करताना मंत्री गडकरी यांनी उद्योगांना सरकारकडे इथेनॉल निर्यात करण्याची परवानगी मागायला सांगितली. ते म्हणाले की, मी समजावण्याचा प्रयत्न करेन, पण ते पूर्णपणे माझ्या हातात नाही. श्रीलंका, बांगलादेश आणि इतर अनेक देश पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या दिशेने काम करत आहेत, कारण ते किफायतशीर आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. परिणामी बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका येथे इथेनॉल निर्यात करण्याची संधी मिळेल. हेदेखील एक चांगले मार्केट असू शकते. गडकरी म्हणाले की, या परवानगीसाठी मी वाणिज्य मंत्रालयाकडे विनंती करेन. साखर निर्यातीबाबत इथेनॉलचे उत्पादन वाढवता येईल. उद्योगाला कोणत्या अडचणी येत आहेत ते मला माहीत आहे.
मंत्री गडकरी म्हणाले की,आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला चांगला भाव मिळत आहे, मात्र निर्यातीला परवानगी नाही. मला ठाऊक आहे की आपण ग्राहक आणि शेतकरी या दोघांच्या हिताचे रक्षण केले पाहिजे. उद्योगाची आर्थिक व्यवहार्यता सुनिश्चित करण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत. जोपर्यंत साखरेच्या साठ्याचा प्रश्न आहे, तुम्ही तुमची बाजू अन्न मंत्रालयासमोर मांडाल. त्या समितीचा मीदेखील सदस्य आहे. मी सुचवितो की तुम्ही तुमची बाजू समितीसमोर मांडा. आम्ही त्यावर विचार करू. स्वावलंबी भारतासाठी कृषी क्षेत्रात अधिकाधिक रोजगार निर्माण करणे आवश्यक असून त्यात साखर उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.