पुणे : वेस्ट इंडियन शुगर मील्स् असोसिएशन (विस्मा) या खाजगी साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांची सेन्ट्रल रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती सदस्य म्हणून निवड केल्याचे सेन्ट्रल रेल्वेने पत्राद्वारे कळवले आहे. सेन्ट्रल रेल्वे ग्राहक सल्लागार समिती सदस्य म्हणून ठोंबरे हे महाराष्ट्रातील मध्य रेल्वेच्या कार्यकक्षेतील सर्व प्रकारच्या सेवा उपभोक्ता सल्लागार समितीवर सदस्य म्हणून महाराष्ट्रातील साखर उद्योग तसेच अन्नधान्य वाहतुक व विविध उपभोक्तांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्यांची नियुक्ती 30 सप्टेंबर 2026 पर्यंत करण्यात आल्याचे मध्य रेल्वे महा प्रबंधक यांनी कळवले आहे.
बी.बी.ठोंबरे यांनी महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी दिलेले योगदान व ऊस उत्पादक शेतकरी, ग्रामीण अर्थकारण,जलसंधारण, कृषिमाल प्रक्रिया उद्योग व प्रामुख्याने साखर उद्योगामध्ये अनेक नाविण्यपूर्ण प्रयोग करून ग्रामीण विकासाला व साखर उद्योगाला दिशा देण्याचे बहुमोल कार्य केलेले आहे. बी.बी.ठोंबरे यांच्या निवडीमुळे सेन्ट्रल रेल्वे बोर्डमार्फत साखर उद्योग व धान्य वाहतुकीसह इतर सर्व रेल्वे ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी बी.बी.ठोंबरे हे सूचना करतील. बी.बी.ठोंबरे यांची निवड झाल्याबद्दल ‘विस्मा’चे सर्व सदस्य साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, साखर उद्योगातील मान्यवर, नॅचरल शुगरचे संचालक, प्रवर्तक यांनी बी.बी.ठोंबरे यांचे अभिनंदन केले.