जालना : अंबड व घनसावंगी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड होते. मात्र, दिवसेंदिवस ऊस उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सेंद्रिय खतांच्या वाढत्या किंमती आणि रासायनिक खतांचा अतिरेकी वापरामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. एकेकाळी एकरी ६० ते ८० टन उत्पादन होत असताना, आज ते ३० ते ४० टनांवर आले आहे. सद्यस्थितीत काही शेतकऱ्यांना सुरूच्या उसाला पहिल्या वर्षी एकरी ५० ते ६० टन उत्पन्न मिळत आहे. मात्र, नंतर उत्पादन घटल्याचे दिसते. वारंवार ऊस पिक घेतल्यामुळे जमिनीतील पोषणतत्त्वांची घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
खऱ्या अर्थाने, आज अनेक शेतकऱ्यांना ऊस पिकवण्याच्या तांत्रिक बाबतीत पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही. सरकार आणि कारखान्यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण पुरविले पाहिजे, मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारच्या कृषी विभागाकडून ऊस उत्पादनवाढीसाठी आवश्यक प्रयत्न होताना दिसत नाहीत. जमिनीच्या आरोग्याचे परीक्षण, योग्य पद्धतीने खतांचा वापर, पीक व्यवस्थापनाबाबत माहितीचा अभाव आहे. उत्पादन खर्च, जमिनीचा घटता पोत, रासायनिक खतांचा अनिबंध वापर आणि कारखान्यांची उदासीनता ही कारणेसुद्धा असल्याचे मानले जाते. आता तर खतांच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना हवे तेवढे खत वापरणे शक्य होत नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर दिला पाहिजे. सरकार आणि साखर कारखान्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करण्याची गरज आहे.