कोल्हापूर : आजरा तालुक्यात गुऱ्हाळघरे बंदच; शेतकरी हवालदिल

कोल्हापूर : आजरा तालुक्यात दरवर्षी नोव्हेंबरमध्ये गुऱ्हाळघरे सुरू होतात. मात्र, यावर्षी विविध कारणांमुळे सुरू झालेली नाहीत. तालुक्यातील गुऱ्हाळघरांमध्ये शांतता असल्याचे पाहावयास मिळत आहे. गुऱ्हाळघरे सुरू करण्याबाबत शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले असले तरी गुऱ्हाळमालक गुऱ्हाळघरे सुरू करावी की नको, या मनःस्थितीत आहेत. गुळाला चांगला हमीभाव मिळत नसल्याने आणि गुऱ्हाळघराचा खर्च परवडत नसल्याने हे व्यावसायिक आणि शेतकरीही हवालदिल झाले आहेत.

आजरा तालुक्यात गुऱ्हाळ घरांची संख्या घटली आहे. पूर्वी पेरणोली, देवर्डे, सिरसंगी, भादवण, किणे आदी गावांत अनेक गुऱ्हाळघरे होती. सध्या साखर उद्योगातील अनिश्चितता, गुळाला मिळणार कमी हमीभाव, मजूर टंचाई, जळणाचा वाढलेला खर्च, कमी ऊसपुरवठा तसेच गुंतवणुकीच्या तुलनेत मिळणारे कमी उत्पन्न या सर्व बाबींचा विचार करता गुऱ्हाळघरे अडचणीत असल्याने त्यांची संख्या घटली आहे. यंदा साखर कारखाने १५ नोव्हेंबरनंतरच सुरू करण्याची परवानगी साखर आयुक्तांनी दिली होती. परंतु, परतीचा पाऊस, ऊसदराची कोंडी, विधानसभा निवडणुकीचा परिणाम यामुळे साखर कारखाने उशीरा सुरू झाले. त्याचबरोबर गुऱ्हाळ घरांचा हंगामही लटकला आहे. याबाबत चाफवडेचे सरपंच धनाजी दळवी म्हणाले की, गुऱ्हाळघर चांगला व्यवसाय आहे. परंतु, स्थानिक मजुरांची कमतरता असल्याने बाहेरील राज्यातील मजुरांवर अवलंबून राहावे लागते. मजुरांअभावी चालूवर्षी गुऱ्हाळघरे बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here