मुंबई : सोमवारी 23 डिसेंबर रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जोरदार तेजी झाल्याचे पाहायला मिळाले. एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागाची खरेदी वाढल्याने शेअर बाजाराला गेल्या आठवड्यातील विक्रीच्या दबावातून काहीसा दिलासा मिळाला. सेन्सेक्स 498.58 अंकांनी वाढून 78,540.17 वर आणि निफ्टी 165.95 अंकांनी वाढून 23,753.45 वर बंद झाला. सुमारे 1565 शेअर्स वाढले, 2348 शेअर्स घसरले आणि 134 शेअर्स अपरिवर्तित राहिले.
निफ्टी ऑटो निर्देशांकात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. निफ्टी आयटी, जो सकाळी 1 टक्क्यांनी वाढला होता, तो बंद होताना 0.13 टक्के वाढून बंद झाला. निफ्टी बँक, मेटल आणि रियल्टी यांनीही 0.8 -1.5 टक्क्यांच्या श्रेणीत व्यवहार केला. बँकिंग क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय आणि ॲक्सिस बँक यांच्या समभागामध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली, तर मेटल पॅकने JSW स्टील, टाटा स्टील, कोल इंडिया आणि वेदांता यांसारख्या समभागांमध्ये 1-2 टक्के वाढ नोंदवली. गेल्या तीन महिन्यांत 16 टक्क्यांनी घसरलेला FMCG निर्देशांक 1 टक्क्यांनी वाढला.