कर्नाटक – चिदानंद कोरे कारखान्याच्या माध्यमातून साखर उद्योग सक्षम करण्यास हातभार : संचालक भरतेश बनवणे

बेळगाव : चिक्कोडी येथील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महामंडळाचे संचालक अमित कोरे यांचा ४५ वा वाढदिवस वृक्षारोपण, बक्षीस वितरण अशा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी कारखान्याचे संचालक भरतेश बनवणे म्हणाले की, राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अमित कोरे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. साखर उद्योगातील अपार ज्ञान अमित कोरे यांना आहे, त्यांनी कारखान्याची गाळप व इतर क्षमता वाढविण्यासोबत साखर उद्योगाला सक्षम करण्यास हातभार लावला आहे.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण तसेच विविध क्रीडा स्पर्धेमधील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कारखाना आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. बी. खंडगावे यांनी मनोगत व्यक्त केले. कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाशुगर प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना तसेच आहार व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, संचालक अजित देसाई, मल्लाप्पा म्हैशाळे, चेतन पाटील, महावीर कात्राळे, भीमगौडा पाटील, अण्णासाब इंगळे, डॉ. अल्लमप्रभू कुडची आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here