कोल्हापूर :राज्यात एकूण ऊस क्षेत्राच्या सुमारे तीस टक्के ऊस तोडणी (केनकटर) यंत्राने होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर हे प्रमाण ४० टक्यांवर गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतांशी साखर कारखान्यांनी यंत्राला प्राधान्य दिले आहे. अनेक कारखान्यांनी गळीताची क्षमता वाढविली आहे. जर क्षमतेनुसार गाळप करायचे झाल्यास तोडणी यंत्राशिवाय पर्याय नसल्याचे साखर कारखानदारांचे म्हणणे आहे.
‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कोल्हापूरसारख्या उसाच्या अग्रगण्य जिल्ह्यातही यंदा पहिल्यांदाच सुमारे दोनशेहून अधिक यंत्रे उसाची तोड करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी कारखान्यांकडे यंदा पहिल्यांदाच १० ते ७० यंत्रे तोडणीसाठी उपलब्ध आहेत. मराठवाड्यामध्येही अनेक कारखान्यांनी यंत्राने ऊसतोडणीचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढविले आहे.
निवडणुकीमुळे उशिरा हंगाम सुरू झाल्याने गेलेला वेळ भरुन काढण्यासाठी कारखान्यांनी ऊस तोडणी मजुरांपेक्षा यंत्रेच पाठविली. एका दिवसातच दीडशे ते दोनशे टन उसाची तोडणी होत असल्याने तोडणीची गती वाढली. यामुळेच ऊस पट्ट्यामध्ये यंत्राने तोडणी केलेल्या उसाची वाहनेच अधिक प्रमाणात दिसत आहेत. उसाची तातडीने तोड झाल्याने शेतकऱ्यांनाही पुढील पिकांसाठी तातडीने रान मोकळे होते. यामुळे शेतकरीच ऊस तोडणी यंत्राला प्राधान्य देत आहेत.