सोलापूर : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यामार्फत सभासदांना दरवर्षी दिवाळी व गुढीपाडवा या सणासाठी २० रुपये किलो दराने २५ किलो साखर दिली जाते. ही साखर न घेतलेल्या सभासदांना २७ ते ३१ डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत कारखाना साइटवर साखर देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.
अध्यक्ष पाटील म्हणाले, यंदाच्या हंगामात २९ दिवसांत एक लाख मे. टन गाळप पूर्ण केले आहे. सध्या प्रतिदिन ३७०० ते ३९०० मे. टन गाळप होत असून, हंगामअखेर पाच लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. त्या दृष्टीने कामगारांचे सहकार्य मिळत आहे. २०२४ या वर्षात ज्या सभासदांनी साखर घेतलेली नाही अशा सर्व सभासदांनी आपले साखर कार्ड नोंद करून २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान कारखाना साइटवरून कार्यालयीन वेळेत साखर घेऊन जावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
कारखान्याचे अपूर्ण शेअर्स, ऊसबिल अॅडव्हान्स येणे, बेणे अॅडव्हान्स येणे, बेसल डोस येणे, ऊस तोडणी वाहतूक येणे तसेच अन्य प्रकारची कारखान्याची येणेबाकी ज्या सभासदांकडे आहे अशा सभासदांची साखर शासनाच्या धोरणानुसार देता येणार नाही. तरी सभासदांनी आपल्याकडील कारखान्याच्या देणी रकमा भरून साखर घेऊन जावी, असे प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी म्हटले आहे.
यावेळी उपाध्यक्ष तानाजी खरात, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर तसेच कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.