लातूर : मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी सातत्याने शेतक-यांच्या विकासाला प्राधान्य दिले असून साखर उद्यागात सक्षम व यशस्वी साखर कारखाने म्हणून मांजरा परिवारातील साखर कारखान्यांची देशभरात ओळख आहे. विद्यमान 2024-25 मध्ये गाळप झालेल्या उसाला विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना, विलास साखर कारखाना युनिट 1 या तीन साखर कारखान्यांकडून पर प्रति टन 3,000 रुपये देणार असल्याची माहिती मांजरा परिवाराचे मार्गदर्शक, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मांजरा कारखाना येथे साखर पोते पूजन प्रसंगी दिली.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील साखर कारखान्यांनी विद्यमान गळीत हंगामात २०२४-२५ साठी गाळप झालेल्या ऊसाला पहिली उचल २७०० रुपये दिलेली आहे. यंदा उत्तम पाऊस असल्याने साखर उतारा चांगला प्राप्त होत आहे. त्यामुळे निश्चितच ऊसदर हा किमान ३ हजार रुपये असणार असून हंगाम समाप्तीनंतर जर ३ हजारांपेक्षा अधिक दर निघत असेल तर तोदेखील दिला जाईल, असे देशमुख यांनी सांगीतले. यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील उत्पादित २,२२,२२२ व्या (५० किलो) साखर पोत्याचे देशमुख यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुख, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विलास कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे, रेणाचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, रेणाचे संचालक प्रविण पाटील आदींची उपस्थिती होती.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.