अहिल्यानगर : ऊसदरप्रश्नी शेतकरी संघटनांचा आक्रमक पवित्रा, ३,००० रुपये प्रती टनची मागणी

अहिल्यानगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ३,००० रुपये प्रती टन भाव जाहीर करून शेतकऱ्यांना हमीपत्र द्यावे, अन्यथा एकही कारखाना चालू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समन्वय बैठकीत दिला. मंगळवारी झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बैठकीत कारखाना प्रतिनिधींना विचारणा केली असता, सहा कारखान्यांनी २७०० ते २८०० भाव जाहीर केले, तर इतरांनी आमची बैठक झाल्यावर जाहीर करणार असल्याचे सांगितले. बहुतांश कारखान्यांकडून साखरेसह इतर उप उत्पादनाची निर्मिती केली जाते. मात्र, शेतकऱ्यांना त्या प्रमाणात भाव दिला जात नसल्याकडे शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले, तरीही कारखान्यांनी भाव जाहीर केला नसल्याने बैठकीच्या सुरुवातीलाच शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रादेशिक सह संचालक (साखर) बिडवई यांनी १०.२५ रिकव्हरीला ३४०० रुपये प्रति टन भाव देणे कारखान्यांना बंधनकारक असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी म्हणाले, साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कमी दर देऊ नये. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांचे समाधान होईल, असा दर देण्याचा प्रयत्न करावा. निवासी उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उप विभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, उपसंचालक साखर संजय गोंदे, जिल्हा सहकार उपनिबंधक गणेश पुरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्यासह शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हार्वेस्टर चालकांकडून लूट सुरू आहे. कारखाने तोडणीचे पैसे देत असूनही त्यांच्याकडून शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी केली जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांनी करार करून तोडणीसाठी लावलेल्या हार्वेस्टर चालकांना शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे न घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here