पुणे : ऊस गळीत हंगामास साखर आयुक्तांनी १५ नोव्हेंबरला परवानगी दिली. मात्र, प्रत्यक्षात काही कारखाने डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू झाले. यामध्ये ऊस उत्पादकांनी आपला ऊस कारखान्यांना पाठविला. मात्र, एक महिना होऊन गेला तरी सुरुवातीला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे इंदापूर परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. एरवी ऊसदरावरून पहिली उचल जादा देण्यावरून रस्सीखेच लागणाऱ्या पुणे जिल्ह्यातील साखरपट्ट्यात यंदा मात्र अल्प ऊस असून, देखील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटून गेला, तरी पहिली उचल कुणीही जाहीर केलेली नाही. त्यामुळे दराबाबत संगनमत करून तर हे साखरसम्राट गप्प नाहीत ना? अशी साशंकता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
गेल्या दीड महिन्यापासूनची ऊसदराची कोंडी फुटण्यास तयार नाही. ऊसदराअभावी काही कारखान्यांनी गाळलेल्या उसाचे काहीच पैसे शेतकऱ्यांना दिलेले नसल्याने त्यांची अतिशय खराब स्थिती झालेली आहे. शेतकऱ्यांनी ऊस पीक साखर कारखान्यांत गाळपासाठी दिले. मात्र, त्याचे पैसे मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. याबाबत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. ते म्हणाले की, साखर सम्राट राज्यकर्त्यांना जर त्यांच्या राजकीय कामातून वेळ मिळाला नसेल तर किमान शेतकऱ्यांना पहिला हप्ता पाचशे रुपये तरी द्यावा, अशी मागणी साखर आयुक्तांकडे करणार असून, लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम नाही मिळाले नाही, तर आंदोलन केले जाईल.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.