कोल्हापूर : मराठवाड्यात बीड, परळी, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आदी ठिकाणांहून जिल्ह्यात २१ हजार २२८ ऊसतोडणी मजूर पत्नी, मुलांसह दाखल झाले आहेत. ते विविध २३ साखर कारखाना कार्यस्थळावर आणि ऊस पट्ट्यात पालाची झोपडी मारून राहिले आहेत. यामध्ये ८,६८१ महिला ऊस तोडणी, भरणीचे काम करीत आहेत. आरोग्य प्रशासनाकडील अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. यामध्ये १२० गर्भवती आहेत. शिवाय मजुरांच्या कुटुंबासोबत पाच वर्षांच्या आतील १७१२ बालके आहेत. मजूर दिवसभर ऊसतोडणी, भरणीचे काम ते करतात. त्यांच्यासोबत पत्नी, मुलेही आहेत. मुले, मजुरांची हिवताप, इतर साथीच्या आजारांची तपासणी केली जात आहे.
गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच आरोग्य प्रशासनाने प्रत्येक कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना पत्र पाठवून मजुरांच्या आरोग्याची काळजी सेवा सुविधा द्या आणि त्याचा आठ दिवसांतून एकदा अहवाल द्या असे कळवले. मात्र, एकाही कारखान्याने यासंबंधीचा अहवाल दिला नाही म्हणून आरोग्य विभाग आपल्या मार्फत आरोग्य सुविधा पुरवत आहे. मजूर मजुरांसोबतच्या महिला स्वयेपाक करून ऊसतोडणी, भरणीचे काम करीत आहेत. त्यामध्ये १२० गर्भवतीही आहेत. शरीराला विश्रांतीच्या कालखंडातही गरिबीमुळे त्याही तोडणी, भरणीच्या कामात मदत करतात. त्यांच्यापर्यंत शासकीय आरोग्य यंत्रणा पोहोचली आहे. त्यांना आवश्यक वैद्यकीय सेवा दिली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे म्हणाले की, ऊसतोडणी मजुरांना आरोग्य विभागाच्यावतीने काही सुविधा पुरवल्या जात आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. हंगामाच्या काळात त्यांच्यात कोणत्याही प्रकारच्या साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये, याकडेही विशेष लक्ष दिले आहे.